अवस्था लावोनि गेला... 

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी कार्यवाह उद्धव कानडे यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त (6 जानेवारी) त्यांच्या स्मृतींना उजाळा

उद्धव कानडे गेले, त्याला आज एक वर्ष होईल. या वर्षभरात असा एकही दिवस गेला नाही की, कानडेंची उणीव भासली नाही किंवा त्यांची आठवण आली नाही. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये पाय टाकला की कानडेंची आठवण यायची. कोणत्याही कार्यक्रमात सूत्रसंचालन चुकीच्या दिशेने चालले की कानडेंची आठवण यायची. प्रा. मिलिंद जोशी आणि सुनीताराजे पवार यांच्याशी गप्पांचा अड्डा जमला की कानडेंची आठवण यायची. सचिन इटकर किंवा पुरुषोत्तम सदाफुले भेटले की कानडेंची आठवण यायची. एखा‌द्याच्या जाण्याने एखा‌द्या क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असे कुणी म्हटले तर ते अतिशयोक्त वाटायचे, परंतु उद्धव कानडेंच्या जाण्यामुळे केवळ पुण्याच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातच पोकळी निर्माण झाली असे नाही तर माझ्यासारख्या हळव्या मनाच्या त्यांच्या मित्रांच्या भावविश्वातही पोकळी निर्माण झाली आहे.

कानडे लहानपणापासून पुण्यातच वाढले. साहित्याची आवड आणि साहित्यिकांची मैत्री हे त्यांचे वैभव होते. नारायण सुर्वे, डॉ. निर्मलकुमार फडकुले असे कितीतरी साहित्यिक पुण्याला येण्याच्या आधी कानडेंना फोन करायचे आणि कानडे त्यांचे पुण्यात स्वागत करण्यापासून त्यांना परतीच्या गाडीत बसवून देण्यापर्यंत त्यांच्यासोबत रहायचे. या काळात दोघांच्या अखंड गप्पा चालायच्या. कानडेंनी मोठ्या लेखकांच्या आठवणी लिहून काढाव्यात असे मी त्यांना अनेकदा सुचवले होते. कानडे गेले आणि त्यांच्याबरोबर साहित्यिकांच्या या सुंदर आठवणीही गेल्या.

स्वतः उद्धव कानडेंच्या आठवणी सुरू होतात त्या त्यांच्या आईपासून. त्यांची आई रानात, उन्हातान्हात राबायची. शेतात, घरात पुरुषाला करावी लागतात तीही सर्व कामे तिलाच करावी लागायची. कष्टाची कामं करताना घामानं भिजून पार चिंब व्हायची. या माऊलीला कष्टापासून कधीच सुटका मिळाली नाही. उद्धव पोटात असताना सगळे महिने तिला सगळी कामं करावीच लागली.

दोन-तीन दिवस शेतात पेरणी चालू होती. एकाएकी मुसळधार पाऊस सुरू झाला. कानडेंच्या आईला 'वेणा' सुरु झाल्या. तिने शेतातून बाहेर पडायचा प्रयत्न केला; पण तिला माती सोडिना. एक पाय उचलला की दुसरा पाय मातीत फसायचा. तो कसा बसा काढला की पहिला मातीत रुतायचा. बाळाच्या वेणा तिला असह्य झाल्या. आई तशीच खाली कोसळली. पाऊस आणि मातीशिवाय तिच्याजवळ कोणीच नव्हतं. ना डॉक्टर, ना सुईण, ना एखादी मैत्रीण. अशा मुसळधार पावसात उद्धवचा जन्म झाला. दुःख पाचवीला पूजलेले असणे म्हणतात ते कानडेंच्या बाबतीत अक्षरशः खरं आहे.

त्यानंतर आला १९७२ चा दुष्काळ. मराठवाड्यासाठी जीवघेणाच होता तो. शेतात करावयाची कामे नुरल्यामुळे अनेक शेतमजुरांनी मुंबई-पुणे गाठले. त्याच कारणाने आणि काळात कानडेंची आई पुण्याला आली. पुण्याला तिने अक्षरशः फूटपाथवर गोणपाटाखाली दिवस काढले. रस्त्यावर हमाली करत गुजराण करू लागली.

आपल्या मुलासाठी उद्धव कानडेंच्या आईने ज्या हालअपेष्टा सहन केल्या त्याच्या आठवणी त्यांच्या तोंडून ऐकताना हृदय पिळवटून यायचे. उद्धव कानडे आठवीच शिकत होते तेव्हाची गोष्ट. शाळेची फी भरली नाही म्हणून वर्गशिक्षकाने त्यांना वर्गाबाहेर काढले. आई कळवळली. पुण्याहून ४० किलोमीटर दूर एका नातेवाईकांकडे पायी चालत गेली आणि त्यांच्याकडून वीस रुपये घेऊनच परत आली. उद्धवच्या कोवळ्या आणि संवेदनशील मनावर हा प्रसंग कायमचा कोरला गेला. भोगाव्या लागलेल्या दुःख आणि प्रतिकूलतेमुळे बालवयातच कानडेंच्या उपजत प्रतिभेला अंकुर फुटायला लागले. त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. मान टाकून रडायला त्यांना कवितेचा खांदा मिळाला.

आणखी एक प्रसंग. कानडेंची आई खडी केंद्रावर काम करायची तेव्हाची गोष्ट. शाळेला उन्हाळ्याची सुटी होती. म्हणून पंधरा दिवस उद्धवने खडी फोडली. तेव्हा त्यांना कष्टाची मजुरी मिळाली. ती देताना मुकादमाने त्यांना 'अंगठा कर' असे म्हटल्यावर कानडे म्हणाले, "मला सही येते", त्यांनी सही केल्यावर साहेबांनी त्यांची अधिक विचारपूस केली. तेव्हा त्यांना हेही कळले की, हा पोरगा कविता करतो. या कविता चंद्र चांदण्याच्या किंवा फुलाफुलाच्या नव्हत्या. भोगीले जे दुःख त्याला काव्य म्हणावे लागले ! पुढे काही दिवसांनी त्यांनी दुष्काळावर कविता लिहिली. ती कविता त्याच साहेबांनी सर्व मजुरांसमोर म्हणायला लावली. मजूरवर्गाची वेदनाच त्यात शब्दबद्ध झाली होती. मजुरांनी टाळ्यांचा कडकडाट केला. हे कानडेंचे पहिले कवितावाचन आणि त्यांच्या कवितेला मिळालेली पहिली दाद !

एकीकडे कानडेतला कवी घडत, विकसत होता. पुण्यातल्या वाङ्मयीन वातावरणात ते वावरत होते. अनेक लेखक, कवींचा सहवास त्यांना लाभत होता. त्यांची वाचनाची भूकही वाढत होती आणि पुण्यातली समृद्ध ग्रंथालये त्यांना तृप्त करीत होती. कविवर्य नारायण सुर्व्यानी त्यांना सर्वाधिक प्रभावित केले, त्यांचा विपुल सहवासही त्यांना लाभला. कविता वाचनासाठी आवश्यक असा मधुर आवाज त्यांना लाभलेला होता. अनेक कवीसंमेलनात ते भाग घेऊ लागले. सूत्रसंचालनाची त्यांची कला हळूहळू विकसित होत गेली. कानडे हे नाव साहित्यक्षेत्रात आता बऱ्यापैकी स्थिरावत होते.

सुमारे चाळीस वर्षे कानडेंची साहित्यसेवा झाली. त्यांचे पाच कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या निवडक कवितांचे संपादन मी केले आणि त्याला 'समतेचा ध्वज' हे अन्वर्थक नावही मला सुचले. चांगली कविता लिहिणे वेगळे आणि चांगली कविता सादर करता येणे वेगळे.

उदगीरला झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. फारच सामान्य कविता निष्प्रभपणे सादर केल्या जात होत्या. मी सूत्रसंचालकाच्या हातून माईक घेतला आणि कानडेंना या संमेलनात रंग भरण्याचे आवाहन केले. कानडेंनी आपली 'भिकारी' ही कविता अत्यंत प्रभावीपणे सादर केली आणि कवीसंमेलनात एकदम चैतन्य आले.

आपल्याकडे सूत्रसंचालन करणाऱ्या कलावंतांचा श्रोत्यांना फार राग येतो. ते जास्त झाले तरी खटकते आणि कमी झाले तरीही खटकते. सूत्रसंचालनकार फ.मु. शिंदे गमतीने म्हणत असतात की, आमचाही नाइलाज असतो कारण सूत्रसंचालनाचे स्वतंत्र कार्यक्रम होत नाहीत ना ! मला उद्धव कानडेंचे सूत्रसंचालन आवडायचे. प्रभावी सूत्रसंचालन ही व्यासंगाने साधणारी कला आहे. कार्यक्रमाचा दर्जा उंचावणं, प्रेक्षकांशी संवाद ठेवत वातावरण हलतं, जागतं आणि प्रसन्न ठेवणारा कार्यक्रमामधला तो एक मोठा कलावंतच असतो. उद्धव कानडे हे असे किमयागार होते.

समोरच्या माणसाला सुखावण्याची एक सुंदर कला कानडेंना अवगत होती. त्यांच्यासोबत तासन् तास मी महाराष्ट्र साहित्य परिषदेत बसलो आहे. ज्योत्स्ना नांदगिरीकर किंवा पराग कुलकर्णी यांच्यासारख्या तिथल्या कार्यकर्त्यांना कानडे इतक्या गोड आणि आर्जवी स्वरात काम सांगायचे की त्यांना आपल्या हातातली सगळी कामे टाकून फक्त कानडे सांगतील तेच काम करावेसे वाटे.

आपल्या भोवतीच्या माणसांमधली कला किंवा साहित्यिक गुण हेरून त्यांचा यथोचित सन्मान करण्याची एक स्वागतशील वृत्ती कानडेंमध्ये होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार तर त्यांच्याच हातात होते आणि कानडेंच्या निपक्षपणाबाबत प्रा. मिलिंद जोशी यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. कानडे आणि मिलिंद जोशींच्या मुळे शेकडो उपेक्षित आणि दुर्लक्षित प्रतिभावंतांचा सन्मान झाला आहे. जो विश्वास मिलिंद जोशींचा कानडेंवर होता तोच विश्वास सचिन इटकर आणि पुरुषोत्तम सदाफुले यांचा कानडेंवर होता. डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार, नारायण सुर्वे पुरस्कार असे अनेक पुरस्कार या दोघांच्या मार्फत कानडेंनी गुणीजनांना दिले आहेत.

डॉ. संभाजी मलघे, कानडे आणि मी असे एक त्रिकूटच होते. आमचे तिघांचे कवितासंग्रह आणि बालकवितांचे संग्रह आम्ही एका वेळी, एका प्रकारचे काढले आहेत आणि काढायला लावले आहेत. शिरीष चिटणीसांच्यामुळे सातारा हे आमच्या तिघांच्या चळवळींचे एक उपकेंद्र झाले होते. पुण्यात हौस फिटली नाही म्हणून आम्हाला वाटतील ते आणि वाटतील तेवढे कार्यक्रम आम्ही शिरीष चिटणीसांच्या जीवावर साताऱ्यामध्ये घेतले आहेत. या सगळ्या सुंदर आठवणी अजूनही मनात रुमझुमत असतात.


हेही वाचा /ऐका - ऑक्टोबर : इंद्रदिन आणि यक्षरात्री (विश्वास वसेकर यांच्या ऋतु बरवा या ऑडिओ बुकची झलक)


शेकडो आठवणी आहेत. एका सत्कारात कानडेंनी माझ्याबद्दलचे नितांतसुंदर मानपत्र वाचले. सत्काराला उत्तर देताना मानपत्राचा उल्लेख करून मी म्हणालो, "इस बात पर पार्टी तो बनती हैं." यावर व्यासपीठावरून संयोजक अ‍ॅड. प्रमोद आडकर ओरडले, "आणि मला?.” हासून सगळ्या श्रोत्यांसमोर मी म्हणालो "हो, तुम्हालाही." ती पार्टी काही झालीच नाही.

शेवटीची आठवण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातली आहे. जवळजवळ अठरा दिवस मी तिथे अ‍ॅडमिट होतो. एका विराट यंत्राखाली झोपवून माझ्या कसल्यातरी तपासण्या चालल्या होत्या. त्या यंत्रापर्यंत मला दिलीप फलटणकर घेऊन गेले होते आणि तशा विचित्र अवस्थेत कानडे मला भेटायला आले आणि माझी ती तशी अवस्था पाहून कानडेंना भडभडून आले. कानडेंच्या डोळ्यातले अश्रू पाहून दिलीप फलटणकरही स्वतःला सावरू शकले नाहीत. त्यानंतर कानडेंची माझी पुन्हा भेट नाही. भेटली ती त्यांच्या मृत्यूची वार्ताच. जेव्हा आपण एखादा मित्र गमावून बसतो तेव्हा ते अंशतः आपलेच मरण असते. कानडेंच्या मृत्यूमध्ये मी माझाही मृत्यू अनुभवला आहे. जो पर्यंत हे हृदय स्पंदत राहील तो पर्यंत त्यातून कानडेंच्या आठवणी झिरपत राहतील. मित्रा, तू जिथे असशील तिथे तुला सलाम !

- प्रा. विश्वास वसेकर 
मोबाईल – 9922522668
(लेखक बाल-कुमार साहित्यिक, कवी आणि माजी प्राध्यापक आहेत)

Tags: मराठी साहित्य परिषद उद्धव कानडे विश्वास वसेकर साहित्य आठवणी Load More Tags

Comments:

प्रतिमा अरुण काळे

अप्रतिम शब्दांकन...समोर जणू मी हे क्षण अनुभवते.जिवाभावाची मैत्री .....त्या मैत्रीतील असा विरह....एकमेकांना दिलेला अमूल्य वेळ,त्या आठवणी पुन्हा नाही...तो विचित्र क्षण जीव नकोसा करतो.आपल्या मित्राला भोगावे लागलेले दुःख....किती वेदनादायक असते.....एक एक प्रसंग समोर येतो....स्व.उध्दव कानडे सरांचे जीवन रेखाटले. सरांच्या कार्याची ओळख झाली...गरिबीच्या/ वेदनेच्या चटक्यातून जे शब्द बाहेर येतात ती असते आंतरिक कविता.....मनात खळबळ चालू असते....ते व्यक्त होणे गरजेचे असते.असे किती तरी ज्वालामुखी काव्यातून रिते करतो..तेव्हा ते जिवंत होते...आंतरिक मनाला ते भिडते.प्रथम स्मृती दिनास विनम्र अभिवादन.

Add Comment